बंगळुरू :महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये एकमेकांवर मोठे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बाजपावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपा नेत्यांनी ऑपरेशन कमळ राबवण्यासाठी प्रत्येक आमदाराला 50 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप केला आहे. म्हैसूर इथल्या एका कार्यक्रमात बोलताना सिद्धरामय्या यांनी हा आरोप केला आहे. सिद्धरामय्या यांच्या या आरोपांनी मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या 50 आमदारांना प्रत्येकी 50 कोटींची ऑफर :बुधवारी म्हैसूर जिल्हा प्रशासनानं टी नरसेपूर विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचं उद्घाटन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी 470 कोटी रुपयांच्या इमारतीची पायाभरणी करण्यात आली. या कार्यक्रमानंतर थेट लाभार्थ्यांना लाभाचं वितरण करण्यात आलं. यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपा नेत्यांवर हल्लाबोल केला. यावेळी बोलताना त्यांनी, भाजपानं काँग्रेस आमदारांना 50 कोटींची ऑफर दिली. हा पैसा कुठून येतो? येडियुरप्पा, बोम्मई, यांनी पैसे छापले आहेत का? राज्याची लूट करुन उभारलेला हा पैसा आहे का ? असा सवाल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला.