VIDEO : ताटातूट झालेल्या पिल्लांशी तीन दिवसांनी झाली मादी बिबट्याची भेट, पाहा व्हिडिओ... - कराड वनविभाग कर्मचारी
कराड (सातारा) - कराड तालुक्यातील भोळेवाडी गावात ऊसतोड सुरु असताना मजुरांना पंचवीस ते तीस दिवस वयाची दोन बिबट्याची पिल्ले आढळून आली होती. ही माहिती मिळताच कराड वनविभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. दोन्ही पिल्लांना सुरक्षित ठिकाणी हलविले. पिल्लांसाठी मादी बिबट्या आक्रमक होऊ नये म्हणून, पिल्ले ज्याठिकाणी सापडली त्याच ठिकाणी क्रेटमध्ये पिल्लांना ठेवण्यात आले. आजुबाजूला ट्रॅप कॅमेरे लावले. दोन दिवस बिबट्याची मादी पिल्लांकडे फिरकली नाही. तिसऱ्या दिवशी उसाच्या शेतानजीक नांगरलेल्या मोकळ्या रानात क्रेटमध्ये पिल्लांना ठेवण्यात आले. वासाने मादी बिबट्याला पिल्लांचा सुगावा लागावा, म्हणून पिलांचे मुत्र आजुबाजूच्या दगड, झाडांवर शिंपडण्यात आले. रात्री ११.३० वाजता बिबट्याची मादी तेथे आली. रात्री १.३० वाजेपर्यंत ती पिल्लांसोबत होती. नंतर ती पिल्लांना सुखरूपपणे घेऊन गेली. हा सर्व प्रकार वनविभागाच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे, वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, डॉ. चंदन सवने , वनरक्षक शीतल पाटील, उत्तम पांढरे, भरत खटावकर, वनमजूर शंभू माने, अमोल पाटील यांनी मादी बिबट्याची पिल्लांशी भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले.