OBC Reservation : ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका झाल्या तर, मतदानावर बहिष्कार- बाळासाहेब सानप - OBC VGNT
पुणे - महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय जाहीर झालेल्या निवडणुका पार पडणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नवीन अधिसूचना न काढण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तर, आतापर्यंत जाहीर झालेल्या निवडणुकांच्या अधिसूचनेत कोणताही बदल करू नये, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे राज्यातील 92 नगरपरिषदांच्या निवडणुका वेळेत आरक्षणाशिवाय पार पडणार आहेत. यावर ओबीसी व्हीजीएनटी जनमोर्चा संघटना आक्रमक झाली आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका झाल्या तर, रस्त्यावर उतरून आंदोलन करू. वेळ प्रसंगी ओबीसी समाज मतदानावर बहिष्कार घालेल अशी आक्रमक भुमिका ओबीसी व्हीजीएनटी जनमोर्चा संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी व्यक्त केली आहे.