भावना गवळी यांचे पूर्वाश्रमीचे पती प्रशांत सुर्वे यांचा शिवसेनेत प्रवेश; यवतमाळमध्ये राजकीय घडामोडींना वेग
यवतमाळ - गेल्या महिन्याभरात महाराष्ट्रात अनेक राजकीय भुकंप झाले. संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी शिवसेनेचे नेते आमदार हे बंडखोरी करुन शिंदे गटात सामील झाले. त्यांनी भारतीय जनता पार्टी सोबत एकत्रित येत एक नवे सरकार स्थापन केले. दरम्यान यावेळी आमदार संजय राठोड हे सुद्धा शिंदे गटात सामील झाले होते. त्यांच्या पाठोपाठ खासदार भावना गवळी ह्या सुद्धा शिंदे गटात सामील झाल्या. त्यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडल्याचे दिसून आले. यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता भावना गवळी यांचे पूर्वाश्रमीचे पती प्रशांत सुर्वे यांनी ( Bhavana Gawali ex-husband Prashant Surve ) सेनेत प्रवेश केला. सन २०१४ मध्ये वाशिम जिल्ह्यात लोकसभेची शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची इच्छा उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे अपक्ष निवडणूक लढवली, मात्र, पराभूत झाले होते. खासदार भावना गवळी आणि कॅप्टन प्रशांत सुर्वे यांचा २०१२ मध्ये घटस्फोट झाला आहे. एकंदरीत प्रशांत सुर्वे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने यवतमाळ जिल्ह्यातील राजकारणातील समीकरण काही वेगळे तर नसेल ना असा प्रश्न जनसामान्यातून व्यक्त होत आहे. यावेळी राजकीय विश्लेषक गणेश बयास यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.