VIDEO : हल्ली गदाधारी हिंदुत्वाच्या गप्पा मारल्या जातात; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
मुंबई - हल्ली 'गदाधारी' हिंदुत्वाच्या गप्पा मारल्या जातात. पण रोज सकाळी टीव्ही पाहिला की ते 'गधाधारी' दिसतात, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. 'अमित शाह आणि भाजपाची वाटचाल' या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवाद असलेल्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात मुंबईत ते बोलत होते. या पुस्तकातून अमित शाह यांचा संपूर्ण जीवनपट साकारण्यात आला आहे. भाजपची वाटचाल आणि त्यात अमित शाह पर्व याचा संपूर्ण मागोवा त्यात आला आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व उलगडण्याचा, सोपे करून सांगण्याचे काम लेखकांनी केले आहे. परंतु मेहनत, त्याग आणि प्रखर राष्ट्रवाद असे अनेक पैलू अमित शाह यांच्या व्यक्तिमत्वात आहेत असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मंगल प्रभात लोढा, आशीष शेलार, अतुल भातखळकर, उपस्थित होते.