VIDEO : नाना पटोले म्हणजे राजकीय गूढ भाषेचे जनक, मुनगंटीवारांची कोपरखळी - नाना पटोले
नाना पटोले हे समीकरण राजकीय समजाच्या पलीकडले आहे. त्यांच्या कुठल्या वक्तव्याचा काय अर्थ निघेल हे सांगता न येण्यासारखे आहे. पटोले म्हणजे राजकिय गूढ भाषेचे जनक आहेत, असे म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पटोलेंवर कोपरखळी मारली. नाना पटोले कधी म्हणतात की, आपण काय करतो याचा सगळा रिपोर्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जातो, तर दुसऱ्या दिवशी याच वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना पटोले म्हणतात भाजपला संपविण्यासाठी मी हे भाष्य केले. आमच्याकडे एक म्हण आहे 'सासू बोले सुना लागे' याच प्रमाणे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर भाष्य केले तर ते भाजपला लागते, अशा नव्या गूढ भाषेचा शोध हा पटोले यांनी लावला आहे. म्हणूनच ते आधुनिक युगातील राजकीय गूढ भाषेचे जनक आहेत असे म्हणत मुनगंटीवार यांनी पटोले यांच्या वक्तव्याच्या गंभीरतेबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सध्या पटोले यांनी केलेली अनेक विधान चर्चेत आहेत. अशावेळी मुनगंटीवार यांनी त्यांना राजकीय गूढ भाषेचे जनक संबोधून पटोले यांच्या वक्तव्यांच्या गंभीर्याला बगल दिली.