यवतमाळ ग्रामपंचायत निवडणूक : कुठे नेत्यांना धक्का तर कुठे जल्लोष - यवतमाळ ग्रामपंचायत निवडणूक मत मोजणी
यवतमाळ - जिल्ह्यातील 925 ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडले. तर आज सकाळी आठ वाजल्यापासून सोहळाही तालुक्यातील तहसील कार्यालये व पुरवठा विभागाच्या गोदामांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. ग्रामपंचायतींचे निकाल येणे सुरू झाले. विजयी उमेदवारांचे कार्यकर्ते गुलाल उधळून जल्लोष साजरा करत आहेत. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक नेत्यांना पराभूत व्हावे लागले तर, काही ठिकाणी त्यांना विजय मिळवता आला. यवतमाळ तालुक्यातील कीन्ही आणि कापरा या गावात शिवसेनेच्या नेत्यांना धक्का बसला असून शिवसेनेचे माजी सभापती सागरताई पुरी यांना पराभूत व्हावे लागले. वणी येथे जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांच्या पॅनेलला हादरा बसला असून शिवसेनेचे संजय निखाडे यांच्या पॅनेलने 7 पैकी 6 जागांवर विजय मिळवला. काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्या कळंब सावरगाव ग्रामपंचायतीत नऊपैकी सात जागेवर विजय मिळाला आहे. तर याच तालुक्यातील राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्ष मनीषा काटे यांच्या गटाने सहापैकी पाच जागा मिळवल्या. या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी निलेश फाळके यांनी...