मुंबईत व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक
मुंबई - गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने मोठी कारवाई करत व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. या दोघांकडून सात कोटी 75 लाख रुपये किमतीचा हा महागडा पदार्थ जप्त करण्यात आला आहे. लोअर परेलच्या सिताराम मिल कंपाऊंड येथे पोलिसांनी सापळा रचून दोन आरोपींना रंगेहात अटक केली आहे. या दोघांपैकी एक आरोपी मुंबई पोलीस दलातील बडतर्फ पोलीस कर्मचारी आहे. हे आरोपी हा महागडा पदार्थ कोणाला विकणार होते याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. व्हेल माशाच्या उलटीला ओमेट गोल्ड असे देखील म्हणतात. आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारात या व्हेल माशाच्या उलटीला करोडोंची किंमत आहे. या पदार्थापासून अत्तर, परफ्युम बनवले जातात. तसंच सिगरेट, मद्यपेय बनवण्यासाठी देखील याचा उपयोग केला जातो. या दोन्ही आरोपींना कोर्टामध्ये हजर केलं असता या दोघांनाही कोर्टाने 29 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.