Amravati rain : अमरावती - चांदुर रेल्वे रस्त्यावर नाल्याचे पाणी आल्याने खोळंबली वाहतूक
अमरावती - मागील चार दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यात आज सायंकाळच्या सुमारास तब्बल दीड ते दोन तास मुसळधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील नदी - नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे, अमरावती - चांदुर रेल्वे मार्गावरील वाघामाय मंदिराजवळ नाल्याचे पाणी रस्त्यावर आल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबली असल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे, अमरावती - चांदुर रेल्वे मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. तब्बल 20 वर्षांनंतर अशा प्रकारे रस्त्यावर पूर आल्याचे परिसरातील नागरिक सांगत आहे. दरम्यान या पावसाचा अनेक पिकांना फटका बसला असून जिल्ह्यातील अनेक भागातील पिके पाण्याखाली आली आहेत. त्यामुळे, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.