कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विरारचे जीवदानी देवी मंदिर भाविकांसाठी बंद - jeevdani devi temple virar closed
पालघर/विरार - राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. राज्य सरकारने याबाबत 5 एप्रिलपासून कठोर नियमावली जारी करत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार आता धार्मिक स्थळे भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्यास सुरुवात झाली आहे. विरार येथील जीवदानी देवी मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून पुन्हा बंद ठेवण्यात आले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार जीवदानी देवी मंदिर ट्रस्ट प्रशासनाकडून पुढील आदेश येईपर्यंत ३० एप्रिल पर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, असे असले तरी देवीच्या दर्शनासाठी तुरळक भाविक येत असून गडाच्या पायथ्याशी असलेल्या छोट्या मंदिरात दर्शन घेत आहेत. देवीच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असल्याने त्यांच्यासाठी मंदिर ट्रस्टच्यावतीने घर बसल्या ऑनलाईन दर्शनाची सोय केली आहे.