ST Employees Protest : एसटी कर्मचारी निलंबनाच्या कारवाई विरोधात कर्मचाऱ्यांचे 'मुंडण आंदोलन' - चंद्रपुरात 14 कर्मचाऱ्यांना निलंबित
चंद्रपूर - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कर्मचाऱ्यांनी संपूर्ण राज्यात कामबंद आंदोलन पुकारले असताना चंद्रपुरात 14 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश प्राप्त झाले होते. या विरोधात पीडित कर्मचाऱ्यांनी मुंडण आंदोलन (ST workers mundan protest) करून या निर्णयाविरोधात निषेध नोंदवला. महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे तसेच हे महामंडळ महाराष्ट्र शासनात सामावून घ्यावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे. मात्र सध्या दिवाळीचा हंगाम सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विविध आगारात तब्बल 250 बसेस उभ्या आहेत. त्यामुळे महामंडळाला देखील आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर चंद्रपूर जिल्ह्यात काल मोठी कारवाई करण्यात आली. चंद्रपूर आणि राजुरा आगारातील 14 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई विरोधात आज (बुधवारी) निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांनी मुंडण आंदोलन करून निषेध नोंदवला. ज्या कृती समितीने हा निर्णय घेतला त्याच्या कारवाईला विरोध करण्यात आला. जोवर न्याय मागण्या पूर्ण होत नाही तोवर हे आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका या कर्मचाऱ्यांनी मांडली आहे.