...अखेर रस्त्यावर धावली लालपरी, रायगड जिल्ह्यातील आठ आगारात बससेवा सुरू - लालपरी
पेण (रायगड) -एसटीचे शासनामध्ये विलिनीकरण करा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी सुरू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सामील झालेल्या रायगड जिल्ह्यातील संपकरी कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी दुपारपासून टप्प्याटप्प्याने रुजू झाले आहेत. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून डेपोमध्येच थांबून असलेल्या लालपरी म्हणजेच एसटी बसेस आजपासून पुन्हा एकदा पेणच्या रस्त्यावर धावू लागल्या आहे. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील एसटी सुरू केल्या आहेत. त्यामुळे मागील दोन आठवड्यांपासून जे प्रवाशांचे हाल झाले होते आणि खासगी वाहनांसाठी अधिकचे पैसे मोजावे लागत होते त्या प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. रायगड जिल्ह्यातील आठ आगारांमधील विविध ठिकाणच्या बसेस सुरू झाल्या असून टप्प्याटप्प्याने कर्मचारी हजर होतील, त्या पद्धतीने जिल्ह्यातील आठही आगारांमधून प्रवाशांसाठी जास्तीत जास्त बसेस उपलब्ध करून देणार असल्याचे विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी सांगितले.