Sindhudurg Floods : तेरेखोल व कर्ली नदीला पूर, बांदा बाजारपेठ पाण्याखाली - महाराष्ट्र पूर
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गुरूवारी रात्री ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यात ढगफुटी झाल्याने कर्ली आणि तेरेखोल नदीला पूर आला आहे. यामुळेच बांदा बाजारपेठ आणि बस स्टँड पाण्याखाली गेले आहे. पुराचे पाणी बांदा बाजारपेठेत घुसल्याने व्यापारी धास्तावले आहेत. बांदा शहरातील आळवाडी-निमजगा रस्ता पाण्याखाली गेला आहे. तेरेखोल नदी दुथडी भरून वाहत आहे. आज सकाळीच नदीचे पाणी पत्राबाहेर येऊन आळवाडी बाजारपेठेत घुसले. शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते आळवाडी मच्छीमार्केट रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. येथील दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने सर्वांची तारांबळ उडाली. स्थानिक ग्रामस्थ व व्यापारी यांनी दुकानातील सामान सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी मदतकार्य केले. सावंतवाडी तालुक्यातील बांदा शहर व परिसराला गेले दोन दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने तेरेखोल आणि कर्ली नदीने गेल्या दहा दिवसांत पुन्हा धोक्याची पातळी ओलांडली आहे. पाण्याची पातळी वाढत असून स्थानिक प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.