डिसले गुरुजी नव्या वादात अडकण्याची शक्यता; माहिती कार्यकर्त्याने केले 'हे' आरोप - माहिती अधिकार कार्यकर्ते दीनानाथ काटकर यांचा आरोप
पंढरपुर (सोलापूर) - बार्शी तालुक्यातील परितेवाडी येथील ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते शिक्षक रणजित डिसले हे नवीन वादात अडकण्याची शक्यता आहे. ग्लोबल अवॉर्ड पुरस्कार संदर्भातील कागदपत्राची कोणती माहिती उपलब्ध नसल्याचा आरोप बार्शी येथील माहिती अधिकार कार्यकर्ते दीनानाथ काटकर यांनी माध्यमांशी बोलतांना केला आहे. दीनानाथ काटकर यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत संबंधीत ग्लोबल पुरस्कारा संदर्भातील माहिती मागवली होती. राज्य शासन किंवा जिल्हा प्रशासनाकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचे उत्तर दीनानाथ काटकर यांना देण्यात आले आहे. या पुरस्काराच्या रकमेबाबत अनेक प्रश्न काटकर यांनी उपस्थित केले आहेत. काटकर यांनी ग्लोबल पुरस्कारा संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालय, राज्यपाल कार्यालय, सोलापूर जिल्हा कार्यालय व प्राथमिक शिक्षण विभागाकडे या संदर्भात मागणी केली होती. मात्र यासंदर्भात संबंधित कार्यालयांकडे माहिती नसल्याचे आढळून आल्याचे काटकर यांनी सांगितले आहे.