चिपळूण महापुरातील 1800 लोकांचं रेस्क्यू, कोरोना रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनअभावी नाही - जिल्हाधिकारी - रत्नागिरी जिल्हाधिकारी
रत्नागिरी - 'चिपळूणमध्ये महापुराने हाहाकार माजवला आहे. पुरात अडकलेल्या 1800 लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. मात्र, धोका अद्याप टळलेला नाही. पुरात अडकलेल्या लोकांनी रेस्क्यू ऑपरेशनला सहकार्य करून त्यांच्यासोबत सुरक्षित स्थळी यावं, असे आवाहन रत्नागिरी जिल्हाधिकारी डॉ. बी एन पाटील यांनी केले आहे.तर, चिपळूणमधल्या पोसरे बौद्धवाडी येथे 17 जण ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. खेड तालुक्यातील धामनंदमध्ये 17 घरांवर दरड कोसळल्याचे समोर आले आहे. यात काहीजण दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, 'धामनंदमधल्या रेस्क्यूसाठी आर्मी पाचारण करण्यात आली आहे. चिपळूणमध्येही NDRF च्या 4 टीम दाखल झाल्या आहेत. आर्मी आणि नेव्हीच्या प्रत्येकी 4 टीम चिपळूणमध्ये पोहचत आहेत. एअरफोर्सच्या 3 हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. कालुस्तेमध्ये हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. चिपळूणमध्ये कोविड रुग्णांचा मृत्यू हा ऑक्सिजनअभावी झालेला नाही', अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.