यवतमाळमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; 81 लाखांचा मुद्देमाल जप्त - यवतमाळ पोलीस कारवाई
यवतमाळ - जिल्ह्यातील स्वरा फार्म हाउसमध्ये धाड टाकून 81 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई भारी गावानजीक करण्यात आली आहे. पोलिसांनी यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील 19 जुगारींच्या मुसक्या आवळल्याने खळबळ उडाली आहे. भारी गावाजवळ असलेल्या स्वरा फार्महाउसमध्ये हायप्रोफाइल जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांना मिळाली. त्यावरून त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला छापा टाकण्याचे आदेश दिले. यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून न्यायालयापुढे हजर करण्यात आले. जुगारींकडून 19 लाख 23 हजार रुपये रोख, एक लाख 30 हजार रुपये किमतीचे सात मोबाइल, 60 लाख 70 हजार रुपये किमतीची पाच चारचाकी वाहने, दोन दुचाकी, असा एकूण 81 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.