#JantaCurfew हिंगोलीत जनता कर्फ्युला उत्स्फूर्त प्रतिसाद; दोघांना घेतले ताब्यात
हिंगोली - जगभरात दहशत माजवलेल्या कोरोना विषाणूचा भारतातील प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 'जनता कर्फ्यु'चे आवाहन केले होते. त्याला हिंगोली जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडणे टाळले आहे. मात्र, रस्त्यावर फिरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. हिंगोली शहरातील नेहमीची वर्दळीची ठिकाणे आज पूर्णपणे ओस पडल्याचे दिसून आले. शहरातून रिकामे फिरणाऱ्यांवर शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. दोघांना ताब्यात घेऊन त्यांची वाहने जप्त करण्यात आली असून त्यांना आता ९ वाजता ती परत केली जाणार आहेत. रस्त्यावरून फिरणाऱ्याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली जात आहे. अत्यावश्यक कारण असल्यास सोडले जाते. शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ए.आय सय्यद हे पोलिसांच्या फौजफाट्यासह शहरामध्ये बंदोबस्तासाठी तैनात आहेत.