माणसांच्या कळपातील हिंस्त्र श्वापदांचा नायनाट करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र यावे - रुपाली चाकणकर
पुणे- मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महिलेवर बलात्कार करण्यात आल्यानंतर तिच्यासोबत अमानवीय कृत्य झाले. या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात खळबळ माजली होती. जखमी अवस्थेत महिलेला उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र मृत्यूशी तिची झुंज अपयशी ठरली आहे. या घटनेवरुन संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. समाजातील विकृत प्रवृत्तींना जरब बसावी , कायद्याचे राज्य असले तरी माणसांच्या कळपात वावरणाऱ्या हिंस्त्र श्वापदांचा नायनाट व्हावा, यासाठी समाजातील प्रत्येक घटकांने एकत्र यावे. तसेच आज समजात जे पॉर्नग्राफी व्हिडियो किंवा वेब सिरीज मोठ्या प्रमाणात वाढले आहे, त्यावर कुठेतरी निर्बंध लावले गेले पाहिजे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.