कोरोना लढ्यासाठी एनसीसी-एनएसएच्या विद्यार्थ्यांची मदत घेणार - गिरीश बापट
पुणे - 'पुण्यात आता एनसीसीचे 200 विद्यार्थी पोलिसांच्या मदतीला घेतले जाणार आहेत. लसीकरण केंद्र, हॉस्पिटल, पोलीस कार्यालये, रहदारी नियंत्रणासाठी या विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. तसेच एनएसएसच्या विद्यार्थ्यांचीही मदत घेतली जाणार आहे', अशी माहिती पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी दिली. पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पुणे जिल्हा कोरोना आढावा बैठकीनंतर बापट बोलत होते. 'कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती कायम असल्याने खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाला करण्यात आल्या. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर विविध हॉस्पिटल, कोविड सेंटर, स्मशानभूमी यामध्ये आवश्यक त्या सोयी तसेच त्यात सुधारणा करायच्या सूचना करण्यात आल्या. पुढच्या काळात दुकानातले कामगार-विक्रेते यांची कोरोना तपासणी दर 15 दिवसांनी करावी, असे ठरवले आहे', असे बापट म्हणाले.