भारत बंद : कृषी कायद्याच्या विरोधात वसईत संमिश्र प्रतिसाद
वसई - केंद्र सरकारच्या नवीन तीन कृषी कायद्याच्या विरोधात लढा सुरू ठेवण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने सोमवारी भारत बंदची घोषणा केली होती. तसेच पेट्रोल, डिझेलची दरवाढ, कामगार विरोधी कायद्यांना विरोध करण्यासाठी देशातील 500 पेक्षा अधिक शेतकरी संघटना व 20 पेक्षा अधिक राजकीय पक्ष या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. मुंबईत 300 पेक्षा अधिक जनसंघटना सहभागी असलेल्या जनआंदोलन संघर्ष समितीची महाराष्ट्र बैठक झाली. महाविकास आघाडी सरकारच्या घटक पक्षांनीही भारत बंदला पाठिंबा दिला आहे. सोमवारी वसई तालुक्यातील महामार्गावर वसई फाटा ,चिंचोटी ,नायगाव येथे शेतकरी सभा महाराष्ट्राच्या वतीने आंदोलन करण्यात आले. नालासोपारा पूर्व तुळींज पोलीस ठाण्याच्या समोर ही कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. तुळींज पोलीस ठाण्याच्या वतीने दहा मिनिटांसाठी या आंदोलनाला परवानगी दिली असल्याचे तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली.