कोरोना योद्धा: अंधेरीमध्ये अवतरला ऑक्सिजन मॅन, तब्बल ११० जणांचे वाचवले प्राण
मुंबई - राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर आहे. राज्यात रोज सरासरी 60 हजार रुग्ण रोज सापडत असून राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासतोय. परराज्यातून ट्रेनद्वारे ऑक्सिजन मागविण्याची वेळ आली आहे. बेड मिळत नसल्याच्या तक्रारी रोज माध्यमातून समोर येत आहे. असे असताना मुंबईच्या अंधेरी भागात एक ऑक्सिजन मॅन अवतरला आहे. त्याने आतापर्यंत 100 जणांना ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर मशीन देऊन अनेकांचे प्राण वाचवलेत. महत्त्वाचे म्हणजे ही मशिन मोफत रुग्णांच्या घरी दिली जातेय. यासाठी पैसे आकारले जात नाही. या ऑक्सिजन मॅनचे नाव मुरजी पटेल आहे. मुरजी पटेल यांची जीवन ज्योती प्रतिष्ठान सामाजिक कार्य करणारी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जवळपास शंभर कोविड रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन दिल्या आहेत. या संस्थेकडे तब्बल साडेतीनशे अशा मशीन आहेत. ऑक्सिजनचा होणारा तुटवडा पाहता या मशीन कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरल्या आहेत. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर या मशीनच्या माध्यमातून घरात हवेपासून ऑक्सिजन जनरेट केला जाऊ शकतो. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रेशर स्विंग एब्जॉर्प्शन टेक्नोलॉजीचा वापर करते.