जालन्यात अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळत नसल्याने शिवसैनिकांचे जलसमाधी आंदोलन
जालना - जिल्ह्यातील राजूर आणि बावणेपांगरी या दोन महसूल मंडळात अतिवृष्टीमुळे नुकसान होऊनही जिल्हा प्रशासनाकडून या दोन महसूल मंडळांना अतिवृष्टीच्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे या दोन महसूल मंडळातील हजारो शेतकरी राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी दिलेल्या अनुदानापासून वंचित राहणार आहे. त्यामुळे तातडीने राजूर आणि बावणे पांगरी या दोन सर्कलमधील शेतकऱ्यांचा अतिवृष्टीच्या यादीत समावेश करावा या मागणीसाठी शिवसैनिकांनी बानेगाव येथील धरणातील पाण्यात उतरून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत दोन सर्कलचा समावेश अतिवृष्टीच्या यादीत करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात नाही तोपर्यंत धरणातून उठणार नाही असा इशाराही आंदोलक शिवसैनिकांनी दिला आहे.