ताडोबातील अधिकाऱ्याचा बळी घेणाऱ्या हत्तीला कार्यमुक्त करण्याचे संकेत - चंद्रपूर
चंद्रपूर - जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील गजराज हत्तीला कार्यमुक्त करण्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत. या प्रकल्पातील बोटेझरी भागात माजावर आलेल्या गजराजने काल मुख्य लेखापाल प्रमोद गौरकार यांना चिरडले होते. हा हत्ती बिथरला होता. याची माहिती वॉकी-टॉकीद्वारे प्रकल्पातील सर्वच भागात देण्यात आली. त्याच वेळेस कोळसा भागाचे सहायक वनसंरक्षक कुलकर्णी आणि प्रकल्पाचे मुख्य लेखापाल प्रमोद गौरकार बोटेझरी भागातून एका वाहनातून जात होते. बिथरलेल्या हत्तीची माहिती न मिळाल्याने अधिकारी बेसावध होते. हत्तीने वाहनावर चाल केली. स्वतःला वाचविताना गौरकार यांचा मृत्यू झाला. आज पहाटे मोठा फौजफाटा घेऊन गजराजला नियंत्रणात आणण्यात आले. गजराजच्या अशा प्रकारच्या धुमाकुळात आजवर तिघांचा मृत्यू झाला आहे.आता प्रधान मुख्य वन्यजीवसंरक्षकांचा सल्ला घेत हत्तीला पुनर्वसन केंद्रात पाठविले जाणार आहे. या प्रकल्पातून हत्तीला कार्यमुक्त करण्याचे संकेत मिळत आहे. मृत मुख्य लेखापाल प्रमोद गौरकार यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मूळ गावी शंकरपूर येथे अंत्यसंस्कार केले जातील.