यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, दिग्रसमध्ये मुसळधार पाऊस - यवतमाळमध्ये जोरदार पाऊस
यवतमाळ - जिल्ह्यातील पुसद, दिग्रस शहरासह परिसरातील ग्रामीण भागात सोमवारी (आज) पावसाने अचानक हजेरी लावली. जिल्ह्यात सोमवारपासून निर्बंध हटविण्यात आल्याने शहरात नागरिकांची गर्दी पहायला मिळाली. त्यामुळे अचानकपणे आलेल्या या मुसळधार पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याची स्थिती निर्माण झाली होती.शासकीय व बाजारपेठेत कामासाठी आलेल्या नागरिकांना रस्त्याच्या कडेला मिळेल त्या ठिकाणी आडोसा घेऊन उभे राहावे लागले. अचानक पाऊस आल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. तर दुसरीकडे पाऊस वेळेवर बरसल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र पुरक पाऊस होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.