अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस; ओढे नाले तुडुंब, गावांचा तुटला संपर्क - akkalkot haevy rain news
अक्कलकोट तालुक्याला शुक्रवारी पावसाने चांगलेच झोडपले. पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढे, नाल्यांना पुर आला आहे. त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे तर शेतामध्ये पाणी घुसल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शुक्रवारी सकाळपासून आलेल्या पावसाने परिसरातील नदी, नाले तु़डुंब वाहु लागले आहेत. जोरदार पावसामुळे कोरेगाव ते कर्जत रस्ता वाहतुकीसाठी बंद झालेला आहे. पावसामुळे ओढ्याची पाणी पातळी वाढली असून रस्त्यावरून एक फुटापेक्षा जास्त पाणी वाहत असल्यामुळे रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. तसेच सांगवी, सलगर, चपळगाव, वागदरी, शिरवळ, चुंगी या गावात देखील जोरदार पाऊस झाला आहे. पहाटेपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर दुपारी अडीच वाजेपर्यंत कायम होता. या पावसामुळे बळीराजा आनंदी झाला असला तरी काही ठिकाणी शेतामध्ये पाणी घुसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान देखील झाले आहे.