VIDEO : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी घेतले तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचे दर्शन.. - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे तीन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान अमरावतीला विविध कार्यक्रमाला जात असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथे थांबून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचे व प्रार्थना मंदिराचे दर्शन घेतले. सण 1966 मध्ये तुकडोजी महाराजांचे भाषण मी प्रयागराज मध्ये ऐकले होते. त्यांनतर आज तुकडोजी महाराजांच्या समाधीच्या दर्शनाचे सौभाग्य मला लाभले असल्याची भावना यावेळी राज्यपालांनी व्यक्त केली. तुकडोजी महाराजांनी त्यांच्या ग्रामगीतेत देशाच्या आणि समाजाच्या हिताच्या गोष्टी त्यांनी लिहल्या आहेत. त्या गोष्टी प्रत्येकाला करणे गरजेचे आहे. ही त्यांच्यासाठी श्रद्धांजली असल्याची प्रतिक्रियाही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली. दरम्यान यावेळी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या पधिकार्यांच्या वतीने राज्यपाल महोदयांना तुकडोजी महाराजांनी लिहिलेली ग्रामगीता तसेच तुकडोजी महाराजांचे साहित्यही भेट देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे जनार्दनपंत बोथे, अध्यात्म विभाग प्रमुख राजाराम बोथे, अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवणीत कौर, उपविभागीय अधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे, अमरावतीचे महापौर चेतन गावंडे, माजी कृषी मंत्री अनिल बोंडे, भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी सह आदी उपस्थित होते.