जनता कर्फ्यू : परभणीच्या जनता कर्फ्यूला उत्तम प्रतिसाद; सर्वत्र शुकशुकाट - कोविड-19 लेटेस्ट न्यूज़
परभणी - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(रविवार) १४ तासांचा जनता कर्फ्यू घोषित केला आहे. त्याअंतर्गत परभणीत देखील याला नागरिकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे. सकाळी ८ च्या सुमारास शहरात सर्व दुकाने, प्रतिष्ठाने कडकडीत बंद होती. एरवी सकाळीच गजबजणारे शिवाजी चौक ८.४० वाजता देखील शांत दिसून आले. कुठलीही रहदारी नव्हती. दरम्यान, महसूल प्रशासनाचे लोक शहरात फिरून परिस्थितीचा आढावा घेत होते. स्वतः जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी शिवाजी चौक, स्टेशन रोड, शनिवार बाजार, विद्यानगर, वसमत रोड, जिंतूर रोड आदी परिसरात फिरून शहराच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत तहसीदार विद्याचरण कडवकर हे देखील उपस्थित होते. एकूणच शहरात जनता कर्फ्यूला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.