अविरत धगधगणारी अमरधाम स्मशानभूमी आर्त रुदनाने निशब्द
अहमदनगर : कोरोनाच्या कठीण प्रसंगात अनेक ठिकाणच्या स्मशानभूमीत सातत्याने चिता जळताना दिसत आहेत. या परिस्थितीचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनाही हे भयावह चित्र पाहून गहिवरून येत असल्याची स्थिती सगळीकडे दिसत आहे. कधी आप्त-स्वकियांच्या लांबून उपस्थितीत तर कधी अनुपस्थितीत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. आप्त, मित्र, सहकारी किंवा त्यांचे जवळचे नातेवाईक यांचा मृत्यू झाला की संबंधितांबद्दल सहवेदना व्यक्त करण्यासाठी स्मशानभूमीत जावेच लागते. मात्र सध्या स्मशानभूमीत जाणे अंगावरच नव्हे तर मनाला, स्वत्वाला शहारे आणणारे आहे. चोवीस तास इथे अम्ब्युलन्सचा वावर, मन घाबरवणारा सायरनचा आवाज, मन पिळवटून टाकणारा आक्रोश आणि चोवीस तास धगधगणाऱ्या चिता अशी स्थिती दिसत आहे. नगरच्या अमरधाम स्मशानभूमीत रोज सरासरी चाळीस कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार होत आहेत. एकाच वेळी कधी वीस तर कधी तीस जणांवर अंत्यविधी पार पाडले जातात. एकाच वेळी पेटलेल्या चितांनी अमरधाम स्मशानभूमी रात्रीच्या अंधारात अगदी उजेडून जाते. पण हाच प्रकाश कोरोनाने घातलेल्या थैमानाचे कटू आणि क्लेशकारक वास्तव डोळ्यासमोर उभा करतोय अशीच भावना व्यक्त होताना दिसत आहे. हे सर्व होत असताना अमरधाम स्मशानभूमीही स्तब्ध.. निशब्द होत असेल.." अशी स्थिती येथे दिसत आहे. याचा आढावा घेतला आहे ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी...