दुष्यंत चतुर्वेदींचा उमेदवारी अर्ज दाखल ; शंभर टक्के विजयाचा व्यक्त केला विश्वास
विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून दुष्यंत चतुर्वेदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, ऊर्जामंत्री नितीन राऊत, पालकमंत्री संजय राठोड आदी नेते उपस्थित होते. यावेळी माध्यमांसोबत बोलताना उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शंभर टक्के विजयाचा विश्वास असल्याचे म्हटले आहे. बाहेरचा उमेदवार असल्याचा आरोप होत असलेल्या दुष्यंत चतुर्वेदी यांनी, 'हा पक्षाचा निर्णय आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर विश्वास दाखवला असून आपल्याला विजयाची पुर्ण खात्री' असल्याचे म्हटले आहे. तर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी, 'राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन पक्षांची महाविकास आघाडीची सत्ता आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन केल्यानंतर आता चतुर्वेदी हे देखील विधानपरिषदेवर शंभर टक्के निवडून येणार' असा विश्वास व्यक्त केला. तसेच, 'काँग्रेसचे सर्व मतदार महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करतील. मात्र, जो पक्षाविरोधात काम करेल त्यांच्यावर कारवाई करू' असेही म्हटले आहे.