अक्षय तृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपतीला 1,111 हापूस आंब्यांची आरास
पुणे - अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पुणेकरांचे लाडके दैवत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात हापूस आंब्यांची आरास करण्यात आली आहे. दरवर्षी अशा प्रकारची आंब्यांची आरास मंदीरात केली जाते. मोठ्या उत्साहात भक्तांच्या गर्दीत आंबा महोत्सव पारंपारिक पध्दतीने साजरा केला जातो. मात्र, कोरोना संकटामुळे सलग दुसऱ्या दिवशी मंदिरात अक्षय तृतीया साध्या पध्दतीने साजरी केली जात आहे. दरवर्षी अक्षय तृतीयेला हापूस आंब्याची आरास करून मंदिर सजवले जाते. बाप्पाच्या आसनाला नैवेद्य म्हणून आंबा तसेच मंदिराच्या परिसरात आंब्याचे तोरण करून हा आंबा महोत्सव साजरा केला जातो. यावर्षी दगडूशेठ गणपतीला 1,111 हापूस आंब्याची आरास करण्यात आली आहे. बाप्पाला आरास केलेले हे आंबे दुसऱ्या दिवशी बाप्पाचा प्रसाद म्हणून ससुन रुग्णालयात रुग्णांना दिला जातो. कोरोनाचे सावट पाहता मंदिरात भाविकांना प्रवेश बंदी करण्यात आली असुन रोडवरुनच भाविकांनी बाप्पाचे दर्शन घेतले.