तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम, मेळघाटात तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस - Cyclone Tauktae update
अमरावती- तौक्ते वादळाचा फटका मुंबई, कोकण किनारपट्टीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना बसला आहे. अमरावतीतही रविवारी आलेल्या वादळी वाऱ्यासह प्रचंड पावसाने मोठे नुकसान झाले आहे. या वादळामुळे मेळघाटात गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस आणि वादळी वारा येत आहे. मेळघाटातील चिखलदऱ्यात वारंवार पाऊस कोसळत असल्याने पावसाळ्यापूर्वी चिखलदरा हिरवाईने बहरेल असे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच मेळघाटात गारपीट आणि पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. रविवारी दुपारच्या सुमारास आलेल्या वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे अमरावती शहरात अनेक ठिकाणी मोठे वृक्ष कोसळले. काही ठिकाणी झाड वाहनांवर कोसळल्याने नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी वीजेचे खांब कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.