VIDEO : घरमालकाच्या घरातील दागिने लंपास करणाऱ्या जोडप्याला अखेर अटक - कोपरगाव पोलिसांची कारवाई
अहमदनगर - कोपरगाव शहरात घर भाड्याने घेवून घरमालकाला चूना लावणाऱ्या दोघांना अटक करण्यात कोपरगाव शहर पोलिसांना यश आले आहे. मुंबईतील भांडूपमध्ये राहणाऱ्या स्मिता उर्फ प्रिती उर्फ प्रिया नवनीत नाईक ( वय 36 ), नवनीत मधुकर नाईक ( वय 41 ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहेत. 2018 साली कोपरगाव शहरातील गांधीनगर भागात राहणाऱ्या महेश नारायण कडलग यांच्या घरात खोली भाडोत्री घेतली. त्यानंतर घरमालकाचा विश्वास संपादन करून जवळपास साडे अकरा तोळे सोने घेवून पोबारा केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याची नोंद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करत या गुन्ह्यातील दोघांना अटक केली. त्यांच्याकडून साडे सहा लाखांचे साडे अकरा तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीना अटक करून त्यांच्याकडून सोने हस्तगत करत सोने मूळ मालक कडलग कुटुंबीयांना परत केले आहे.