VIDEO : कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रंगकर्मींचे अनोखे आंदोलन - जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रंगकर्मींचे अनोखे आंदोलन
कोल्हापूर - निर्बंधाचा पडदा बाजूला करून नाट्यगृह सुरू करा, तसेच गणेश उत्सवात कार्यक्रम करण्याची परवानगी द्या, अशी मागणी करत नाट्यकर्मींनी आज (बुधवारी) जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गाणे म्हणत अनोखे आंदोलन केले. कोरोनामुळे या व्यवसायात काळरात्र झाली असून पुन्हा सरकारने उष:काल आणावेस, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सरकारने 5 नोव्हेंबरपासून नाट्यगृह सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र 15 सप्टेंबरपासून नाट्यगृह उघडावीत, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्याचबरोबर येथील केशवराव भोसले नाट्यगृहाबाहेर सुद्धा त्यांनी अनोखे आंदोलन केले. कोरोनामुळे अनेक समारंभ तसेच नाट्यगृहे सुद्धा बंद झाली आहेत. त्यामुळे कलाकारांच्या हातचे काम गेले आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे सर्वजण मोठ्या आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे आता काही निर्बंध घालून का होईना नाट्यगृहे उघडावीत तसेच आता गणेशोत्सव येत आहे. यावेळी अनेक गणेश मंडळांच्या समोर गाण्याचे, नाटकांचे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम करण्याची तरी परवानगी द्यावी, अशी मागणी या रंगकर्मींनी केली.