दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात, दोन जण गंभीर जखमी - वाशिम लेटेस्ट न्युज
वाशिम - दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी धरणाकडील ३० फूट खोल भागात जावून पडल्याची घटना उंबडॉबाजार ते येवता मार्गावर घडली. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अक्षय सोळंके आणि भीमराज पवार, असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. दोघेही दुचाकीवरून येवता या गावावरून उंबडॉबाजार येथे जात होते. यावेळी धरणाजवळील वळणावर त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी ३० फूट खोल भागात जाऊन पडली. यामध्ये शिंगणापूर येथील अक्षय व भीमराज दोघेही गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुचाकीसह दोघांनाही सखल भागातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले.