Attack Of Stray Dogs : भटक्या कुत्र्यांनी घेतला तरुणाचा जीव, घटना CCTV मध्ये कैद, पाहा Video - तरुणावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला
अलिगड, उत्तर प्रदेशच्या अलिगड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या परिसरात फिरणाऱ्या एका तरुणाचा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. ही संपूर्ण घटना विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिव्हिल लाइन पोलिस स्टेशन परिसरात राहणारा अशरफ सोमवारी नमाज अदा केल्यानंतर एएमयू कॅम्पसमध्ये फिरायला गेला होता. त्याला एकटे पाहून भटक्या कुत्र्यांच्या टोळीने त्याच्यावर अचानक हल्ला केला. भटक्या कुत्र्यांचा कळपाने त्याचा मरेपर्यंत चावा घेतला. या घटनेची माहिती देताना एसपी कुलदीप गुणवत म्हणाले की, आज सकाळी साडेसातच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की, विद्यापीठात एक मृतदेह पडून आहे. माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर फील्ड युनिट आणि डॉग स्कॉड यांना पाचारण करण्यात आले. सफदर अली असे मृताचे नाव असून तो सिव्हिल लाइन येथील रहिवासी आहे. आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तो उद्यानात फिरत होता, त्यावेळी सुमारे 10 ते 12 भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने येऊन त्याच्यावर हल्ला केला. बहुधा त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असावा. मात्र, मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.