साताऱ्यात गुलाबी थंडी अन् दाट धुकं; दवबिंदूंमुळं रस्ते ओले चिंब - गुलाबी थंडी
Published : Nov 29, 2023, 6:15 PM IST
सातारा : सातारकरांसाठी बुधवारची पहाट नयनरम्य ठरली. गुलाबी थंडी, दाट धुकं आणि झाडांच्या पानांवरून टपकणारे दवबिंदू, असा नजारा अनुभवायला मिळाला. दवबिंदूंमुळे रस्ते आणि शिवारे ओली चिंब होऊन गेली. पहाटे व्यायामासाठी तसंच चालण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी ही गुलाबी थंडी अनुभवली. धुक्यामुळे दृष्यमानता २०० मीटर इतकी कमी झाली होती. हेडलाईट, फॉगलाईट लावून वाहने धावत होती. महामार्ग देखील धुक्यात हरवला होता. नदीपात्रांवर धुक्याची चादर होती. कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावर ज्येष्ठ नागरिकांनी गुलाबी थंडीचा आनंद लुटला. दाट धुक्यामुळे सकाळी साडेनऊ पर्यंत सूर्यदर्शन देखील झालं नाही. गुलाबी थंडीचा नजारा सातारकर अनुभवत असतानाच हा दाट धुक्यात गुडूप होणारा प्रकार अनुभवताना आता सातारकरांना विशेष आनंद मिळत आहे. थंडीचा कडाका हळूहळू वाढणार असं दिसत आहे.