Mumbai Local Train: विजेची तार तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत; लोक ट्रॅकवरून निघाले चालत - मुंबई लोकल
मुंबई : मुंबई लोकल ही शहरात वाहतूकीचा वेगवान पर्याय मानला जातो. आज मुंबईतील पश्चिम मार्गावरील लोकल ट्रेन सुमारे 25 मिनिटे उशिराने धावत आहे.पश्चिम रेल्वेची लोकल सेवा पूर्णतः विस्कळीत झाली आहे. दहिसर ते बोरिवली दरम्यान सकाळी लोक ऑफिसला निघाले असताना 10.2 मिनिटांनी ही समस्या समोर आली. त्यामुळे बोरिवली स्थानकावरील सर्व प्रवासी रुळावरून चालत पुढे जाताना दिसले. तीन गाड्या रद्द करून इतर गाड्या वळविल्याची माहिती देण्यात आली आहे. तांत्रिक बिघाडामुळे सुरू झालेल्या या समस्येमुळे विरारहून चर्चगेटकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील एक गाडी 20 मिनिटे दोन स्थानकांवर थांबवण्यात आली. पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले की, कॅटेनरी वायर, ओव्हरहेड वायरचा काही भाग तुटला आहे. त्यामुळे ३ गाड्या थांबवाव्या लागल्या असून उर्वरित गाड्या वळवण्यात आल्या आहेत. तर तांत्रिक बिघाड दूर करण्याचे काम सुरू आहे. दोन तासांनंतर सेवा सुरळीत होणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी स्थानकावर घोषणा करून लोकांना रुळांवर न चालण्याचे आवाहन केले आहे. कार्यालयात जाताना हा बिघाड समोर आल्याने मुंबईकर वाट बघितली नाही. दुरुस्ती होईपर्यंत थांबले असते तर, कार्यालयात पोहोचेपर्यंत अर्धा दिवस निघून गेला असता.