साई विराजणार सुवर्ण सिंहासनी; वर्तकनगर साईमंदिरात वर्धापन दिनाची जोरदार तयारी, बनवला 15 टन लाडूंचा प्रसाद - साई भक्त
Published : Dec 3, 2023, 3:13 PM IST
ठाणे : ठाण्यातील वर्तकनगर येथील साईमंदिर हे साई भक्तांसाठी प्रति शिर्डीचे स्वरूप आहे. दरवर्षी लाखो भाविक या साई मंदिराला आवर्जून भेट देतात. याच श्री साईबाबा मंदिराचा यंदा ३७ वा वर्धापन दिन असून आपल्या साईंसाठी मंदिर समितीनं चक्क सुवर्ण सिंहासन बनवून घेतलं आहे. यावेळी या सुवर्ण सिंहासनाची विधिवत स्थापना केली जाईल अशी माहिती समितीचे संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेवक बळीभाई नईबागकर यांनी दिली. दिनांक ५ डिसेंबर ते ७ डिसेंबर दरम्यान साजरा होणाऱ्या या उत्सवासाठी जवळपास एक लाखाहून जास्त साईभक्त या मंदिराला भेट देऊन आपल्या साईंचे दर्शन घेतील असा अंदाज मंदिर समितीनं व्यक्त केला आहे. यावर्षी येणाऱ्या भाविकांची संख्या एक लाखाहून जास्त असल्यानं त्यांच्या प्रसादासाठी तब्बल 15 टन लाडू बनवण्याचा संकल्प मंदिर समितीनं पूर्ण केला आहे.