Buldhana News : दंगली रोखण्यासाठी बुलढाण्यात राबवला जातोय अनोखा पॅटर्न - शांतता समितीच्या बैठका
बुलढाणा : गेल्या काही काळात राज्यात उसळलेल्या दंगली पाहता बुलढाणा जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी,बुलढाणा जिल्हा पोलीस अनोख्या पद्धतीने उपक्रम राबवत आहे. ठिकठिकाणी बॅनर्स लावून, शांतता समितीच्या बैठका घेऊन, त्याचबरोबर गावात जाऊन कॉर्नर बैठका घेऊन पोलीस सर्वसामान्यांना माहिती देण्यात येत आहे. तसेच अनेकांच्या व्हाट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंटवर पाळत देखील ठेव्यात येत आहे. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला कुठलीही बाधा पोहोचणार नाही यासाठी, प्रत्येक पोलीस चौकीस्तरावर ठाणे प्रमुखांना जबाबदाऱ्या देखील देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात सामाजिक शांतता भंग होऊ नये यासाठी बुलढाणा पोलिसांकडून विशेष अशी खबरदारी घेतली जात आहे. मागील काही दिवसापासून राज्यात मुख्यतः डिजिटल मीडियाच्या माध्यमातून अनेक शहरातील शांतता भंग झाल्याच्या, किंबहुना दोन गटांमध्ये वाद समोर येऊन संपूर्ण गाव परिसर वेठीस धरला गेला. त्याकरिता जिल्हा पोलीस विभागाने जिल्ह्यासह संपूर्ण ग्रामीण भागापर्यंत सुरू केलेला हा प्रयत्न निश्चितच संपूर्ण राज्यासाठी एक नवी दिशा दाखवणारा ठरू शकतो.