Muharram In Solapur : मोहरमची अनोखी प्रथा; हिंदू मुस्लिम समाजातील मुलांना केले जाते मोहरमचा वाघ - पिर मौलाली दर्गा
सोलापूर : शहरात अनेक वर्षांपासून मोहरम सण अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. मोहरममध्ये हिंदू मुस्लिम धार्मिक एकतेचे दर्शन घडते. तर मोहरममध्ये नवसाचे वाघ सजवून नवस फेडण्याची अनेक वर्षांची परंपरा सोलापूरकर जपत आहेत. शहरातील बडे मौलाली दर्ग्याला अनेक हिंदू मुस्लिम भाविक हे आपल्या मुलांना वाघासारखे रंगवून दर्ग्याला दर्शनासाठी घेऊन जाताना दिसत आहेत. अशी आख्यायिका आहे की, ज्या दांम्पत्याला मुलगा होत नाही, ते मुलगा व्हावा म्हणून मौलाली दर्ग्यात येऊन नवस मागतात. नवस पूर्ण झाला की, त्या मुलाला वाघाच्या वेशभूषेत पिर मौलाली दर्ग्यात दर्शनासाठी आणले जाते. जन्मास आलेल्या अपत्याच्या हस्ते दर्ग्यात नैवेद्य दाखवून दर्ग्यासमोर पाचवेळा फेऱ्या मारून बडे मौलाली पिरचे आभार मानले जातात. दर्ग्यात कोणतीही जात-पात किंवा स्त्री पुरूष असा भेदभाव केला जात नाही. दर्शनासाठी हिंदू मुस्लिम महिला-पुरुष सर्वांसाठी दर्ग्यात प्रवेश दिला जातो. मोहरमच्या निमित्ताने राज्यातील अनेक गावामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य दिसून येते. यामागे प्रत्येक ठिकाणी काही आख्यायिका सांगितल्या जातात. यावर लोकांचा विश्वास आहे मात्र 'ईटीव्ही भारत' कोणत्याही अंधश्रद्धेचे समर्थन करत नाही.