International Yoga Day : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हजारो नागरिकांनी केला योग अभ्यास - यशवंत स्टेडियम नागपूर येथे योग दिन साजरा
नागपूर: आज संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. नागपूर येथील यशवंत स्टेडियमवर शेकडोंच्या उपस्थितीत योगाभ्यास करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह शेकडो नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिका व नागपूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जागतिक योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार हर घर अंगण योग अंतर्गत वसुधैव कुटुंबकम करीता योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण जगभरात २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात येतो. यावर्षी नववा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे. आयुष मंत्रालयाकडून या कार्यक्रमाचे आयोजन केले असून 'हर घर आंगण योग', ही टॅगलाईन आयुष मंत्रालयाने निश्चित केली आहे. 'वसुधैव कुटुंबकमकरिता योग', ही संकल्पना यावर्षी ठेवण्यात आली आहे. विद्यार्थीनी केला योग:- योग कार्यक्रमाला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, पतंजली संस्था व याशिवाय अनेक स्वयंसेवी संस्था देखील सहभागी झाले होते. जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिके सादर केले.