बोदवड येथील एसबीआय बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी लांबविली ३१ लाखांची रोकड - बोदवड येथील एसबीआय बँकेचे एटीएम फोडले
जळगाव - बोदवड शहरातील मार्केट कमिटीच्या समोर असलेले एसबीआय बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी तब्बल ३१ लाखांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीन फोडून तब्बल ३१ लाख रुपयांची रोकड लांबविली. चोरट्यांनी सुरुवातीला एटीएम मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारला. त्यानंतर गॅस कटरच्या मदतीने एटीएम मशीन फोडले. हा प्रकार सोमवारी २५ जुलै रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर बोदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. अज्ञात चोरट्यांविरोधात बोदवड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST