Theft At Temple In Junnar: जुन्नरचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात चोरी, घटना सीसीटिव्हीमध्ये कैद - सिद्धिविनायक मंदिरात चोरी
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या जुन्नर शहरातील रविवार पेठेत असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात चोरट्यांकडून मंदिरातील दानपेटी तसेच चांदीचे साहित्य चोरी करण्यात आले आहे. ही घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. घटनेसंदर्भात जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. याबाबत जुन्नर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार म्हटले की, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. राज्यात मंदिरातील चोरीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. कल्याण तालुक्यातील प्रसिद्ध टिटवाळा महागणपती मंदिराशेजारी असलेल्या विठ्ठल मंदिरात 31 मार्च, 2023 रोजी ६ दरोडेखोरांनी मंदिरातील विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीवरील चार मुकुटांची चोरी केली होती. मंदिरातील दानपेटीतील रक्कम आणि देवाला वाहिलेल्या दागिन्यांवर चोरांची वक्रदृष्टी असते. दानपेटीतील रोख रक्कम चोराच्या खिशात जाते तर दागिने एखाद्या सराफाला विकून सहजपणे पैसे मिळविता येतात. यामुळे मंदिर हे चोरांसाठी आवडीचे ठिकाण बनत चालले आहे. त्याला चाप लावण्याचे आव्हान पोलिसांच्यापुढे आहे.