कंटेनर पलटी होऊन लागलेल्या आगीत चालक जळून खाक, तब्बल तीन तास वाहतूक ठप्प - कंटेनर चालकाचा जळून मृत्यू
Published : Jan 19, 2024, 9:38 AM IST
ठाणे Thane Road Accident : घोडबंदर रोडवरील पाटलीपाडा ब्रिजवर एका कंटेनरचा अपघात होऊन लागलेल्या आगीत कंटेनर चालकाचा जळून मृत्यू झाला आहे. पहाटे साडेतीनच्या आसपास अग्निशमन दलाला याबाबत सूचना मिळाल्यानंतर अग्निशमन दलांच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. जवळपास तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर वाहतूक पोलिसांनी हा रस्ता मोकळा केला. पोलिसांनी पलटी झालेला कंटेनर सरळ करुन वाहतूक सुरळीत केली. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत असून अपघाताचा आणि या आगीच्या भडक्याचा शोध घेत आहेत.
या अपघाताच्या ठिकाणी तीव्र उतार आणि मग पुलाचा तीव्र चढाव आहे. त्यामुळं अंदाज न आल्यानं नियंत्रण गमावल्यानं आतापर्यंत इथं अनेक अपघात झालेले आहेत. अपघातांमध्ये अनेकांचा मृत्यू देखील झालेला आहे. त्यामुळं या ठिकाणी उचित उपाययोजना करून अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन नागरिक करत आहेत. दरम्यान अपघातामध्ये पलटी झालेल्या कंटेनरला आग कशी लागली आणि कंटेनरमध्ये जळालेला मृतदेह कोणाचा होता, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. आगीमध्ये जळून खाक झालेला मृतदेह पोलिसांनी शव विच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवलेला आहे.