Thane Nale Safai : ठाणे महापालिका क्षेत्रात कामगारांच्या जीवाशी खेळ; सुरक्षा साहित्यविनाच नालेसफाई सुरू - जगदीश खैरालिया
ठाणे :ठाणे महापालिका क्षेत्रात पावसाळापूर्वीची नाल्यांची तसेच गटारांची सफाई करण्याची जोरदार कामे सुरु झाली आहे. ही सफाई करणारे कामगार मात्र सुरक्षा साहित्याविनाच सफाई करत असल्याची बाब उघड झाली आहे. श्रमिक जनता संघ आणि म्युज फाऊंडेशनने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे छायाचित्रांसहित यासंदर्भात तक्रार केली आहे. यावर कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे. ठाणे शहरातील नालेसफाई कामांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडे श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी लेखी निवदेन दिले होते. त्यामध्ये वर्षभरासाठी प्रत्येक कामगाराचा वैद्यकीय विमा, कामगारांना सुरक्षा साहित्य पुरवावे ही मागणी त्यांनी केली होती. या मागणीकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याची बाब जगदीश खैरालिया यांनी उघडकीस आणली. कामगारांना ठाण्यातील सर्व नाले आणि गटारांमध्ये उतरवून सफाई करण्यात येत आहे. तसेच दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील गटारामध्ये या सर्व कामगारांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा साहित्ये दिलेले दिसुन येत नाही. या प्रकरणी कंत्राटदार व संबंधित पालिका अधिकारी यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मात्र वारंवार तक्रारी करुन देखील या कामगारांकडे पालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याने या कामगारांच्या आरोग्याला आणि जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. दरवर्षी सुरू असलेल्या नालेसफाईमुळे शहरातील कचरा देखील साफ होतो. मात्र प्रत्यक्षात हे काम करणाऱ्या कामगारांचा जीव नेहमीच धोक्यात असतो, कारण नाल्यात उतरून नालेसफाई करत असताना विद्युत वाहिन्या, प्राणी, दूषित वायू आणि प्रदूषित पाण्यामुळे कामगारांचा जीव धोक्यात असतो.
हेही वाचा -