BRS Performance: असा असेल 'बीआरएस'चा पुढील प्रवास...राज्यातील सर्वच निवडणुका 'बीआरएस' लढवणार - बीआरएस
पुणे : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांचा 'बीआरएस' पक्ष चर्चेत असून राज्यात अनेक जणांचे 'बीआरएस'मध्ये पक्ष प्रवेश होत आहे. तसेच राज्यभर 'बीआरएस' पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी 'अब की बार, किसान की सरकार' असे होर्ड्रिंग देखील लावण्यात येत आहेत. नुकतेच तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि 'बीआरएस' पक्षाचे प्रमुख के. सी. राव यांनी आपल्या मंत्रिमंडळासह पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेतले. यावेळी तिथे देखील त्यांनी अनेक जणांचे पक्ष प्रवेश केले. 'बीआरएस'चा राज्यात वाढता प्रभाव पाहता विरोधकांकडून या पक्षावर भाजपची 'बी टीम' असल्याची टीका केली जात आहे. तर सत्ताधारी पक्षाच्या वतीने 'बीआरएस' फक्त जाहिरातबाजी करून दिशाभूल करत असल्याची टीका केली जात आहे. अशातच राज्यात 'बीआरएस'ची पुढील रणनीती आणि राज्यातील वाढता प्रभाव यावर आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद याने या पक्षाचे राज्याचे नेते बाळासाहेब सानप यांच्याशी खास बातचीत केली आहे. जाणून घेऊया 'बीआरएस'ची रणनिती...