शाळेतील विद्यार्थिनींच्या भानामतीसारख्या विचित्र वर्तनाने शिक्षक-पालकांमध्ये घबराट
बागेश्वर: उत्तराखंडमधील जिल्ह्यातील ज्युनिअर हायस्कूल रेखौली येथे गेल्या दोन दिवसांपासून मुली बेशुद्ध पडत आहेत. दोन दिवसांपासून विद्यार्थिनी काही विचित्र गोष्टी करत आहेत, हे पाहून शाळेतील कर्मचारी आणि पालकही घाबरले आहेत. अशा परिस्थितीत आता शाळा व्यवस्थापनाने या संपूर्ण प्रकरणाची माहिती शिक्षण विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच शिक्षण विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांनीही शाळेत पोहोचून तपासणी केली. रेखौली येथील रहिवासी बलबीर सिंग यांनी सांगितले की, रेखौली येथील शासकीय कनिष्ठ हायस्कूलमध्ये दोन दिवसांपासून मुली विचित्र पद्धतीने वागत आहेत. कधी त्या वेगवेगळ्या ठिकाणी बसून किंचाळत असतात. तर कधी केस पिंजारून थरथरत असतात. याशिवाय कधी-कधी डान्सही करतात. अशा परिस्थितीत विद्यार्थिनींची ही अवस्था पाहून पालक आणि शिक्षक सर्वच नाराज झाले आहेत. बलबीर सिंह यांनी सांगितले की, बुधवारी वर्ग सुरू होताच एक-एक करून सुमारे 15 मुली ओरडू लागल्या. ही बाब गावकऱ्यांना समजताच त्यांनी मांत्रिकाला आणले. काही वेळाने मुली शांत झाल्या आणि त्यांच्या पालकांना फोन करून घरी पाठवण्यात आले. या घटनेची माहिती मुख्य शिक्षणाधिकारी गजेंद्र सोन यांना देण्यात आली आहे. सीईओ म्हणाले की, त्यांना गावकऱ्यांकडून संपूर्ण घटनेची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी त्यांनी सीएमओशी चर्चा केली आहे. विद्यार्थिनींची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक शाळेत पाठवण्यात आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST