Akshaya Tritiya 2023: श्री सिद्धिविनायक मंदिरात हापूस आंब्याची आरास, अक्षय्य तृतीयेनिमित्त सजला गाभारा
मुंबई : राज्यभर आज अक्षय्य तृतीया साजरी केली जात आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो. अक्षय्य तृतीयेचा सण हा वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जातो. हिंदू धर्मात अक्षय्य तृतीया या सणाला विशेष महत्त्व आहे. या निमित्ताने राज्यातील मंदिरांमध्येही उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबई येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात हापूस आंब्याची सुंदर आरास करण्यात आली आहे. आज भाविकांची सकाळपासून दर्शनासाठी गर्दी केली आहे. तसेच आज अनेक मंदिरांमध्ये आंब्याची आरास केलेली पाहायला मिळते आहे. त्याचबरोबर अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दगडूशेठ गणपतीला देखील ११ हजार आंब्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला आहे. अनेक मंदिरात आज गाभाऱ्यापर्यंत रंगीबेरंगी फुलांनी सजावट देखील केली आहे. तसेच मंदिरात विविध कार्यक्रम देखील आयोजित केले आहेत.