Shiv Sena BJP Alliance : मोदींना पंतप्रधान करण्यासाठी भाजप-सेना एकत्र लोकसभा लढवणार - डॉ. भागवत कराड - Modi Prime Minister
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : लोकसभा निवडणुकीला अद्याप एका वर्षाचा अवधी असताना शिवसेना भाजपमध्ये उमेदवारी कोणाला याबाबत रस्सीखेच दिसून येत आहे. भाजप केंद्रीय राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी लोकसभा लढवण्याची तयारी करत असताना, शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांनी देखील लोकसभा उमेदवार आमचाच असे मत व्यक्त केले आहे. त्यावर आता वरिष्ठ निर्णय घेतील असे कराड यांनी सांगितले आहे. उद्धव ठाकरे यांच्या सोबत युती तोडल्यानंतर भाजपने स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केली. तशी रणनिती तयार करत प्रचार सुरू केला. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड हे उमेदवार असतील अशी अप्रत्यक्ष घोषणा करण्यात आली. मात्र एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार फोडत सत्तापरिवर्तन केले.शिवसेनेच्या ताब्यात असणारे मतदार संघात दावेदारी देखील केली असल्याने, औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर शिवसेना लोकसभा लढवेल असा दावा शिंदे गटाचे आमदार पालकमंत्री संदीपान भूमरे यांनी केला. त्यावर भाजप तर्फे सावध भूमिका घेण्यात येत आहे. पक्ष जे ठरवेल ते आम्हाला मान्य असेल, भाजप शिंदे युती ही एकत्रित जागा लढून मोदींना पंतप्रधान करण्यासाठी लढणार असे मत केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड व्यक्त केले आहे.