'राज्यातील शेतकऱ्यांवरील संकट दूर कर'; शरद पवार यांची साई चरणी प्रार्थना - सुप्रिया सुळे
Published : Jan 4, 2024, 11:05 AM IST
शिर्डी Shirdi NCP Shibir : राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकरी राजा या संकटातून बाहेर निघावा, यासाठी शरद पवार यांनी साईचरणी प्रार्थना केली. शेतकऱ्यांवरील संकट दूर कर, असं शरद पवार यांनी साईंचरणी साकडं घातल्याची माहिती, यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गेल्या दोन दिवसांपासून शिर्डी दौऱ्यावर आहेत. आज सकाळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी साईबाबांच्या मंदिरात जाऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी शरद पवार यांनी साईबाबांची पाद्यपूजा आणि शिर्डी माझे पंढरपूर ही छोटी आरतीही केली. यावेळी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुळहुले यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा शॉल साई मूर्ती देऊन सत्कार केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं गेल्या दोन दिवसांपासून शिर्डीत शिबीर सुरू आहे. या शिबिरासाठी राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेत्यांनी शिर्डीत हजेरी लावली आहे.